मुंबई – काही दिवसापुर्वी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि त्यांचे काका शरद पवार यांनी माफ केले आहे. ही माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार गेल्या आठवड्यात निश्चित झाले असताना अजित पवार यांनी अचानक काही आमदारांना घेऊन भाजपशी हातमिळवणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. हा बंड शांत करण्यासाठी पवार कुटुंबियांनी अजित पवारांच्या अनेक भेटी घेतल्या. मंगळवारी त्याला यश आले आणि अजित पवारांनी राजीनामा दिला. यानंतर भाजपचे 3 दिवसांचे सरकार पडले.

 

नवाब मलिक यावर सविस्तर माहिती देताना म्हणाले, शेवटी, आपली चूक अजित दादांनी मान्य केली. हा एक कौटुंबिक मुद्दा असून त्यांना पवार साहेबांनी माफ केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अजित पवार राहतील. पक्षात असलेली त्यांची भूमिका आणि प्रतिष्ठा बदलणार नाही. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बोलत होते.

 

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच आहोत असे अजित पवारांनी सुद्धा स्पष्ट केले. आपण यापूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि यापुढेही पक्षातच राहू. मला राष्ट्रवादीने पक्षातून काढलेले नाही. मी राष्ट्रवादीचाच आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याचा निर्णय आता भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.          

Find out more: