काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी मुंबईतील शिवतीर्थावर होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. सोनिया गांधी यांनी उद्धव यांना एक पत्र लिहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहण्यासाठी शुभेच्छा दिल्या असून या पत्रात काही महत्त्वाच्या बाबीही अधोरेखित केल्या आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष अत्यंत असामान्य अशा स्थितीत एकत्र आले आहेत. देश आज भाजपच्या अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करत आहे. राजकीय वातावरण आज अत्यंत विषारी बनलं आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. शेतकऱ्याला प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात बनलेली महाविकास आघाडी आश्वासक आहे, असा भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
समान किमान कार्यक्रमावर आपल्या तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. त्यामुळेच यात अंतर्भाव असलेली प्रत्येक बाब पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, याबाबत मला पूर्ण खात्री आहे, असे नमूद करतानाच महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच पारदर्शक, जबाबदार आणि गतीमान सुशासन देणारं सरकार आम्ही सारे मिळून देणार आहोत, असे सोनियांनी पुढे नमूद केले.
आदित्य यांनी मला प्रत्यक्ष भेटून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावं असं आग्रहाचं निमंत्रण दिलं. काही कारणाने मी या सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही, याबद्दल क्षमस्व! असं नमूद करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नवी इनिंग सुरू करत असताना माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा, अशा भावना सोनियांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत.