बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आपली पुढील दिशा स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर भाजपमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे. आज (3 डिसेंबर) भाजपचे नेते राम शिंदे आणि विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली . यावेळी त्यांच्यात जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राम शिंदे यांनी पंकजा मुंडेंच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला.
पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर राम शिंदे म्हणाले, “गोपीनाथगडावर सालाबादप्रमाणे दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम असतो. त्या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर घोषणा केली. त्या दरवर्षीच अशी घोषणा करतात. या दिवशी त्या वर्षभरासाठी एक वेगळी दिशा देत असतात. तशीच ही घोषणा होती. मात्र, माध्यमांनी त्यांच्या या घोषणेचा विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”
“हा गोपीनाथ मुंडे यांचा परिवार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रात नेलं. अशा नेत्याच्या पंकजा मुंडे कन्या आहेत. अनेक मतदारसंघात त्यांना बोलावणं असतं, त्या तेथे जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना दुःखी करण्याचं किंवा व्यथित करण्याचं षडयंत्र कोणीतरी रचलं आहे. योग्य त्या वेळी पंकजा मुंडे त्यांची भूमिका जाहीर करतील.”
एकूणच त्यांच्या बोलण्याचा प्रत्येकवेळी विपर्यास केला जातो. त्यामुळे त्या दुःखी आहेत. जेव्हा केव्हा असा काही प्रसंग येईल तेव्हा एकमेकांना भेटणं, संवाद करणं ही भाजपची संस्कृती आहे. संभाषणातून दुःख कमी होत असतं. माझं आणि त्यांचं नातं अतिशय जवळचं आहे. म्हणूनच मी त्यांना प्राधान्यानं भेटायला आलो. विनोद तावडे देखील माझ्यासोबत होते, असंही त्यांनी नमूद केलं.