नवी दिल्ली – मंगळवारी लोकसभेमध्ये डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. डोंबिवलीकरांना लोकलमधील गर्दीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी डोंबिवलीत लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी मागणी केली.
सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेत डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. कल्याण आणि बदलापूरवरुन लोकल आल्यामुळे त्यामध्ये आधीच गर्दी असते. अनेकांना गर्दी असल्यामुळे लोकलमध्ये चढता येत नाही. त्याचबरोबर कामावर जाण्यास उशीर होतो. यामुळे लोकलच्या डोंबिवली स्थानकावरील फेऱ्या वाढण्यात याव्या अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये आज हा मुद्दा उचलून धरला.
डोंबिवली लोकलमध्ये जास्त गर्दी आणि लोकलमध्ये वेळेचा अभाव असल्याचा सुप्रिया सुळे यांनी मुद्दा उपस्थित केला. सुप्रिया सुळेंनी निकषात नियम ३७७ च्या अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार हा मुद्दा उपस्थित केला. डोंबिवली स्थानकावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.