भाजप नेते उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांची एका कार्यक्रमात समोरा – समोर भेट झाली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना मिठी मारली. या दोन नेत्यांच्या भेटीचे वृत्त सर्व माध्यमांवर चांगलेचं प्रसिद्ध झाले. मात्र या भेटीत उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले असल्याचे खोटे वृत्तही आले. या वृत्ताचे खंडन शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून शशिकांत शिंदे त्यांनी ट्विट करत या भेटीबाबतचा खुलासा केला आहे. महादेश शेलार नावाच्या कार्यकर्त्यांचं भिवडी येथे लग्न होतं. त्यावेळी मी तिथे गेलो होतो. एका बाजूला उभा असताना उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. सॉरी चुकलो असं दोन वेळा ते म्हणाले, मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही.
पुढे त्यांना म्हणालो की, तुम्ही स्वत:चे नुकसान करुन घेतले आणि माझेही केले. २० वर्षाच्या राजकारणात माणूस कष्ट करुन निवडून यायला जातो त्यावेळेस आज जर निवडून आलो असतो तर पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिली असती. त्याला मुकलो आहे अशी खंत व्यक्त केली.
तसेच तुम्ही स्वत:चे आणि माझे फार मोठे राजकीय नुकसान केलेले आहे. त्यामुळे आता सॉरी बोलून फायदा नाही. आता त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे ज्या अश्रू आले वैगेरे बातम्या आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेसोबत ठाम आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या आतापर्यंत मी पार पाडत आलो आहे. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आणि मी माझ्या पद्धतीने त्यावर प्रतिक्रिया दिली. एवढ्यापुरतीच ही भेट मर्यादित होती असा खुलासा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान या भेटीमुळे कोणाचाही कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून शशिकांत शिंदे यांनी हे ट्विट करत खुलासा केला आहे. शेवटी त्यांनी असे म्हंटले आहे की, उदयनराजे आणि माझा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी हे सत्य मी समोर आणलं आहे. शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात काम करत आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.