मुंबई : ओबीसी नेत्यांसोबतची भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची बैठक संपली असून एकनाथ खडसे यांची प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी भेट घेतली. ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवी अशी भूमिका मांडल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.
वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय होत असून हे थांबवण्यासाठी आता आम्ही एकनाथ खडसे यांची भेट घेतली. तसेच याकरिता इतर भाजपच्या नेत्यांची पण भेट घेणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शेंडगे यांच्या सोबत आज जे नेते खडसे यांच्या भेटीला गेले होते त्यापैकी एकही जण भाजपचा सदस्य नाही. प्रकाश शेंडगे हे स्वत: सध्या शिवसेनेसोबत असल्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याचा इतर नाराज भाजप नेतेही विचार करत आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विनोद तावडे काल भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. बंडखोरांचा दोन्ही नेत्यांवर वाढता दबाव आणि पक्षातील नाराजी नाट्यावर विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीनंतर एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी गेले होते.
मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोके वर काढले आहे. थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर भाजपचे ज्येष्ठ नेते टीका करत आहेत. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिल्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नेतृत्व दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच भाजपचा संपूर्ण प्रचार फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचे तिकीट कापल्यामुळे आधीच हे नेते राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या चर्चेनंतर या नेत्यांकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.