परळी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मेळा जमणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. मुंडे समर्थकांना संबोधित करताना पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार, आपल्या मनातील नाराजी आणि खदखद व्यक्त करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही तासांत मिळणार आहेत. पंकजा मुंडे दुपारी एक वाजता संबोधित करतील.
पंकजा मुंडेंसह त्यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, सुरेश धस, रासप अध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ महादेव जानकरही गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत.
यापैकी खडसे, तावडे, मेहता यासारखे नेते विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं गेल्यामुळे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे नाराजांच्या मेळ्यात वेगळा मार्ग निघणार, की शक्तिप्रदर्शनात भाजपवर दबाव टाकला जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हा कार्यक्रम राजकीय नसून गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते तिथे येणार आहेत, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. या मेळाव्यातून पोस्टर्सवर आधी कुठेही भाजपचा उल्लेख किंवा कमळ चिन्ह नव्हतं, मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नव्हते. परंतु दुपारनंतर जुने पोस्टर्स हटवून भाजपचं चित्र असलेले नवे बॅनर झळकवण्यात आले.
‘मी लोकांमुळे राजकारणात आले. त्यामुळे लोकांना काय हवं आहे, हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यायचा आहे. मी पहिल्यांदाच निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे ही परिस्थिती वेगळी आहे. म्हणूनच मी आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मी नाराज नाही’ असं पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या घरी येऊन तीन तास चर्चा केली, अशी माहितीही त्यांनी दिली. “मी वैयक्तिक कुणावरही नाराज नाही. पण मी कार्यपद्धतींवरील दोषांवर बोलते. माझी वाढ तशीच झाली आहे. पाच वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्याविषयी मी कार्यकर्त्यांशी बोलेन,” असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.