
नागपुर – दिल्लीमधील जामिया विद्यापीठात घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत त्यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. जे काही दिल्लीत झाले ते जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करुन देणारे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अशांतता आणि अस्वस्थततेचे वातावरण देशात निर्माण केले जात आहे. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरत असून दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बाग सारखे दिवस परत आले की काय? जेव्हा जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसेच वातावरण देशात पुन्हा निर्माण केले जात आहे की काय अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, ज्या राज्यातील तरुण बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून केंद्र सरकारला मी सांगू इच्छितो की तरुणांना तुम्ही बिथरवू नका. ते देशाचे भावी आधारस्तंभ असून ते तरुण आपल्या देशाची आपली शक्ती आहेत. हा तरुण बॉम्ब आहे, त्याची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करु नये अशी विनंती आहे.
यावेळी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. शेतकऱ्यांना मी शब्द दिला आहे आणि मी तो पाळणार आहे. आम्हाला तुम्ही करायला लावले असा आव विरोधकांनी आणू नये. प्रश्न मांडण्याची पद्धत आहे. बोंबलून प्रश्न मांडता येत नाही. उत्तर न ऐकता बोंबलत बसलात तर जनतेसमोर तुमचे बिंग फुटेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.