खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी १४ डिसेंबर रोजी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. त्यात आपण १८ डिसेंबर रोजी एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले होते. यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर अनेकांनी तर्क व्यक्त केले होते. किल्ल्यांसदर्भात काही निर्णय होईल असे काही जणांनी म्हटले होते.
बैलगाडा शर्यतीचा काही जणांनी आणि शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार असल्याच्या शक्यता काही जणांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार आता अमोल कोल्हे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच आपल्या ‘जगदंब क्रिएशन्स’ या बॅनर अंतर्गत तीन चित्रपट येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबतची माहिती कोल्हे यांनी आयोजित एका कार्यक्रमात दिली.
तीन शिवकालीन चित्रपटांची निर्मिती जगदंब क्रिएशन्स करणार असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली. या बॅनरखाली शिवप्रताप या मालिकेतील तीन चित्रपटांची निर्मिती होणार आहे. वाघनखे, वचपा आणि गरूडझेप या तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबर २०२० रोजी या मालिकेतील पहिला चित्रपट वाघनखे हा रिलीज होणार आहे.
तर मराठी आणि हिंदी भाषांमध्ये या चित्रपटांची निर्मिती होणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी ‘शिवप्रताप वाघनंख’ या चित्रपटाचा टीझरही लॉन्च करण्यात आला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकांची ‘जगदंब क्रिएशन्स’ या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे.