![](https://www.indiaherald.com/cdn-cgi/image/width=750/imagestore/images/politics/politics_latestnews/--------------------------0a1cd771-c1a6-4df2-a281-7052a56ae4c6-415x250.jpg)
नागपूर : भारतीय जनता पक्षावर युवासेना प्रमुख आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. तुम्ही कितीही चिखल केला तरी आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता टोला लागवला. मित्रांना सत्ताच्या लोभापोटी कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचा उल्लेखही त्यांनी नचुकता केला.
आदित्य ठाकरे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील संयुक्त सत्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावरील चर्चेत आपले विचार मांडत होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षावर त्यांनी टीकास्त्र सोडले.
भारतीय जनता पक्षाचे नाव आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतले नसले तरी त्यांचा रोख भाजपकडेच होता. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना शिवेसनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. हे जनतेने निवडलेले सरकार नसून राजकीय हाराकिरीने सत्तेवर आलेले सरकार असल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे भाजपवर पलटवार केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. राज्यातील सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमंत्रित केले होते. गेल्या अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी स्नेहभोजन देण्याचा अशा प्रकारचा कार्यक्रम घडल्याचे संबंधित शासकीय अधिकारी म्हणाले.