नागपूर :  बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकवायला हवे असा तर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लढवला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गुरुवारी ते बोलत होते.

 

दरम्यान त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवण्याचा सल्ला कोश्यारींनी दिला आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांविषयी भाष्य केले. तसेच दुष्ट आणि सुष्ट व्यक्तींमधील फरक समजावून सांगितला.

 

राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या भाषणात मुलांना चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक सांगितला. तसेच हे लोक आपलं ज्ञान, शक्ती आणि पैशाचा कसा वापर किंवा गैरवापर करतात, याविषयावर कोश्यारी बोलत होते. कोश्यारी पुढे म्हणाले की, 'एका काळात घराघरात मुलींची पूजा केली जात होती.

 

तुम्ही सर्वजण धार्मिक आहात आणि घरी देवाची उपासना करतच असाल, मात्र आता देशात काय सुरू आहे? दुर्जन लोक महिलांवर बलात्कार करतात आणि त्यांना मारुन टाकतात. पावर म्हणजे एखाद्याला घाबरवणे, धमकावणे किंवा त्यांचं संरक्षण करणे? यामुळेच विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवावेत, यामुळे अशा घटना घडणार नाहीत’ असं कोश्यारी म्हणाले.

 

नागपूर विद्यापीठामध्ये जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाचे राज्यपाल आणि कुलपती असणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या भवनासाठी राहुल बजाज यांच्याकडून 10 कोटीचा सामाजिक दायित्व निधी देण्यात आला आहे. यासाठी राज्यपालांनी बजाज कुटुंबीयांचे कौतुक केले आहे. तसेच संतांची समाजाप्रतीची निष्ठा ही अमूल्य आहे. मात्र, जेव्हा एखादा उद्योगपती संतवृत्तीने वागतो तेव्हा शिक्षणासाठी मदत होते, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

Find out more: