मुंबई : देशातील भाजपचा करिष्मा ओसरताना दिसत असून भाजपच्या हातातून महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड हे राज्य निसटले आहे. झारखंडमध्ये विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मोठी ताकद लावली होती. पण तेथील नागरिकांनी जनतेने भाजपला नाकारल्यामुळे भाजपसाठी मोठा धक्का आहे.
भाजपने दीड वर्षात आपल्या ताब्यातील पाच राज्य गमावली आहेत. त्यामुळे मोदींची लाट ओसरत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. भाजपला राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न नडला आहे. काँग्रेस-झामुमोने झारखंडमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस आघाडीकडून बहुमताचा आकडा पार होताना दिसत असल्यामुळे भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला आहे.
भाजपने राज्याच्या निवडणुकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न यशस्वी होताना दिसला नाही. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर याचा प्रत्यय दिसून आला. राष्ट्रीय मुद्दे भाजपने प्रचारात आणले. पण स्थानिक विकासाचे मुद्दे महाआघाडीने प्रचारात ठेवले होते. काँग्रेस-झामुमोला त्याचा फायदा झाला. त्यामुळे भाजपच्या हातातून सत्ता खेचून आणण्यात काँग्रेस-झामुमो आघाडीला यश आले आहे.
८१ जागांसाठी झारखंडमध्ये निवडणूक झाली. काँग्रेस-झामुमो आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुमतासाठी ४१ जागांवर विजय मिळणे गरजेचे होते. काँग्रेस-झामुमो बहुमत मिळत असल्याने झारखंडमध्ये भाजप सत्तेबाहेर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाला आहे.
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असला तरी जागा कमालीच्या कमी झाल्या होत्या. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंडमधूनही सत्ता जाणार असल्याचे दिसत असल्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. भाजपला मागील दीड वर्षात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ७१ टक्के देशात भाजपला यश मिळाले होते. पण भाजपकडे डिसेंबर २०१९ मध्ये ३५ टक्के सत्ता आहे. गुजरात, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही राज्ये आहेत.