मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नाही. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चिमटे काढले आहेत. बुधवारी बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अटल संध्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, जनतेने निवडून दिलं आहे तर किमान मंत्रिमंडळ विस्तार तरी करा.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या सरकारमध्ये विरोधाभास असल्याने बरीच कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे, की इतके दिवस मंत्रिमंडळ तयार झालेले नाही. तुम्हाला जनतेने राज्य दिलेय, तर किमान मंत्रिमंडळाचा विस्तार तरी करा, अशा शब्दांत सरकारचा समाचार घेतला.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर पोळा फुटेल असं वक्तव्य राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. पिकांची नुकसान भरपाई देण्यापासून या सरकारनं पळ काढला शेतकऱ्यांना फक्त सातशे कोटी रुपये देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका लोणीकरांनी केली. शेतकऱ्यांशी बेईमानी करणं या सरकारला परवाडणार नसून उद्या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होवू द्या मंत्रीपद घेण्यासाठी अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी पोळा फुटेल. कोणता आमदार कोणत्या दिशेनं फुटेल हे कळणार पण नाही, त्यामुळे साखळदंडाने बांधून ठेवलेला आमदारही या सरकारबरोबर राहणार नसल्याचं वक्तव्य लोणीकरांनी केलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री राहिलेल्यांनी एखाद्या साध्या मंत्री पदासाठी कासावीस होणं म्हणजे कलेक्टरनं तलाठी होण्यासारखं असल्याचं म्हणत लोणीकरांनी काँग्रेसमधील दोन्ही चव्हाणांना टोला लगावला आहे.