
जळगाव – आपण शिवसेनेच्या संपर्कात होतो असा खुलासा ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी यासंबंधी बोलताना आपण शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि शिवसेना नेते आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेच्या संपर्कात मी होतो आणि माझ्या संपर्कात सेनेचे नेते होते हे खरे आहे. परंतु चौकशी सुरु झाली असल्याने कारवाई काय होत आहे याची वाट पाहत असल्याचे सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.
माझे तिकीट निव्वळ देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची नाराजी असल्याने कापले गेले असेल तर जे लोक इतर पक्षातील घेतले त्यांच्यावर कोणताही आक्षेप नव्हता असे आहे का? किंवा त्यांना पक्षात आक्षेप असतानाही जाणुनबुजून घेतले का ? याचे मला उत्तर हवे आहे. तुम्हाला इतर पक्षातील लोक चालतात मग नाथाभाऊ का चालत नाही? असे अनेक प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारले आहेत. उपलब्ध माहिती देत त्याआधारे चौकशी करण्याची विनंती मी वरिष्ठांना केली असून त्याला सुरुवात झाली असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
मी पक्षाकडे सातत्याने पक्षाने मला तिकीट का नाकारले याबाबतची विचारणा केली. त्यावेळी मला तिकीट नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. तुमच्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. पण देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर ग्रुपच्या बैठकीत तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती अशी माहिती देण्यात आल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. नाराजी असू शकते पण ती कशाबद्दल होती हेदेखील सांगायला हवे होते. अशी कोणती मोठी चूक केली होती, अशी विचारणा एकनाथ खडसे यांनी केली.