निलंगा : भौतिक सुविधा कमी मिळाल्या तरी चालेल; मात्र शिक्षणासाठी कसल्याच प्रकारचा निधी कमी होता कामा नये. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी आश्वासन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.

 

येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखेच्या वतीने आयोजित शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. निलंगेकर म्हणाले, सत्तेत असो अथवा विरोधी पक्षात असो शिक्षकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे आहोत. ग्रामीण भागातील शिक्षक हा समाजाचा कणा आहे. त्यावरच सबंध देशाचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आजच्या प्रगतिशील तंत्रज्ञानाला जोडण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर आहे.

 

भाजप सरकारने राज्यात सत्ता असताना शिक्षणासाठी 25 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थीही इंटरनेटने जोडले पाहिजेत, या हेतूने डी.आर.सी. सेंटर उभे केले असे सांगून सध्या देशात जातीचे राजकारण करून धर्मात मतभेद निर्माण करण्याचे काम केले जात आहे; मात्र देशातील नागरिकांचा कोणीही अधिकार हिरावून घेऊ शकत नाही.

 

केवळ अज्ञानपणामुळे अशा प्रकाराला हिंसक वळण मिळत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत समाजप्रबोधन करणे ही ग्रामीण भागातील शिक्षकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी 25 शिक्षक, 20 शिक्षिका व 16 उपक्रमशील शाळा यांना हा पुरस्कार देण्यात आला.                                    

Find out more: