नागपूर : सिंचन घोटाळ्याचे सत्य समोर आलेच पाहिजे आणि त्यात कोण जबाबदार आहे हे जनतेला कळलेच पाहिजे. अस मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. ते नागपूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचन प्रकल्पांच्या नावावर लुटला गेलेला पैसा कर दात्यांचा पैसा आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी या मताची स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, फडणवीस सरकाच्या काळात कित्येक घोटाळे झाले आहेत ते मी पुराव्या निशी बाहेर काढणार आहे. बांधकाम आणि आयटी क्षेत्रात मोठे घोटाळे झाले आहेत. तसेच आताच्या सरकारने कर्जमाफी संदर्भात जी आकडे वारी सादर केली आहे ती आकडेवारी राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी मांडावी. 31 हजार कोटींचा आकडा मांडला आहे तो आकडा सविस्तर पणे मांडावा असे राजू शेट्टी म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार ने जाहीर केलेली कर्ज माफी आणि त्यासाठी लावलेले निकषामुळे 6 ते 7 हजार कोटी पेक्षा जास्त रकमेची कर्जमाफी होऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री जयंत पाटील हे 31 हजार कोटींची कर्जमाफीचा दिल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे एकतर अर्थ मंत्र्यांनी त्यांचे आकडे सुधारावे, नाही तर कर्ज माफीचे निकष बदलावे अशी मागणी ही राजू शेट्टी यांनी केली.
आधीच्या फडणवीस सरकार ने कर्ज माफी संदर्भात लबाडी केली होती, आताचे सरकार ही कर्जमाफी संदर्भात लबाडी करत आहे. मात्र, आधीच्या सरकारच्या तुलनेत त्यांची लबाडी कमी असल्याची कोपरखळी ही शेट्टी यांनी मारली.