दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी ‘धार्मिक सांस्कृतिक संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले आहे. पुस्तकाचे नाव ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या पुस्तकावर सदर टीका केली आहे. अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बच्चू कडू यांना या पुस्तकाविषयी विचारलं असता कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका दिवसाची काय एका क्षणाचीही बरोबरी करता येणार नाही, अशी सणसणीत टीका बच्चू कडू यांनी केली.
तसेच यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, अशाप्रकारे कोणी कोणाला उपमा देऊ नये. शिवाजी महाराजांचा भक्त म्हणू शकतो सैनिक म्हणू शकतो, कदाचित सच्चा सैनिक म्हणू शकतो. मात्र, शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करणे हा शिवरायांचा अपमान आहे. त्यामुळे, आम्ही त्याचा निषेध करतो आणि ते पुस्तक तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी करतो.
दरम्यान, मोदीजी फक्त एकट्याचे पाईक आहेत. एखाद्या स्वराज्यावर पाईक असणाऱ्या माणसाने मीच राजा असे म्हणून चालणार नाही, छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, असा टोला देखील कडू यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लगावला.