मुंबई : भाजपा नेते आणि शिवसेने खासदार संजय राऊत यांच्यातील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहिये. संजय राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ते वंशज असल्याचे पुरावे द्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्थरातून टीका होत आहे. हा वाद शमतो ना शमतो तोच राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये राऊत यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
"काही राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार महणून राज्यात काम मिळाले आहे. त्याचा लाभ त्या मंडळींनी जरूर घ्यावा..पण राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही. जय हिंद! जय महाराष्ट्र" असं राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदचं आवाहन केलं आहे. सांगलीमध्ये आज सकाळपासून दुकानं बंद आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या बंदचा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे. सांगली बंद आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.