कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. मी बेळगावला जाणारच आहे. मला कायद्याने रोखा, असं आव्हानच संजय राऊत यांनी पोलिसांना दिलं आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे बेळगाव पेलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावर मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं आहे.
ते नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. बेळगावमधील मराठी लोकांच्या आपण पाठीशी असल्याचं पु्न्हा एकदा शरद पवारांनी म्हटलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यांसाठी चर्चा सुरू आहे. त्यांना दिलासा कसा देता येईल हा आमचा प्रयत्न असल्याचं, पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ‘मी भारताचा नागरिक आहे, बेळगावात जाणार आणि तेथील लोकांशी बोलणार,’ असा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत आज सायंकाळी 4 वाजता बेळगावात पोहचतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे. बेळगावमध्ये संजय राऊत बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन करतील.