मुंबई: सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालूसरे यांच्याशी अमित शहा यांची तुलना करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकाराबद्दल महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला असून यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
‘पॉलिटिकल किडा’ या ट्विटर हँडलवरून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘तान्हाजी’ चित्रपटातील दृश्ये मॉर्फ करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
याआधी मोदींची शिवरायांशी तुलना करणारे पुस्तकच भाजपचे दिल्लीतील एक नेते जयभगवान गोयल यांनी प्रकाशित केले होते. त्यावरून उठलेले वादळ शांत होत नाही तोच हा व्हिडिओ आल्याने समस्त शिवप्रेमींमध्ये संताप आहे. शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर तोफ डागल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे भोसलेंनी याबाबत एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडचं आहे. संबंधित पक्षानं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच, केंद्र सरकारनं चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,’ अशी मागणी केली आहे.
‘आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. आमच्या भावनांची कदर करून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही राजकीय पक्षानं गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.