मुंबई : मुंबईतील नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी याविषयी घोषणा केली होती. मुंबईमध्ये 26 जानेवारी पासून हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. नाईट लाईफच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असते. यामुळे ‘नाईटलाइफ’चा प्रस्ताव राज्यभर राबविणे योग्य ठरणार नाही. मुंबईमध्ये ठराविक ठिकाणी हे प्रायोगिक स्वरूपात राबवता येऊ शकतो. मूळात मला नाईटलाइफ हा शब्दच आवडत नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

मुख्यमंत्री नाईट लाईफविषयी बोलताना पुढे म्हणाले की, मला नाईट लाइफ हा शब्दच आवडत नाही. मात्र एकदा आम्ही मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स हे 24 तास खुले ठेवण्याची परवानगी देणार आहोत. त्यानंतर याचा आढावा घेतला जाईल. यासोबतच त्याच्या परिणामांची माहिती घेऊन पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

16 जानेवारी रोजी आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रमुख, मॉल आणि हॉटेल असोसिएशनच्या प्रमुखांची भेट घेतली होती. काळा घोडा, वांद्रे कुर्ला संकुल आणि नरिमन पॉईंट सारख्या अनिवासी भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी याची सुरूवात करण्यात येणार आहे.                                  

Find out more: