मुंबई : राज ठाकरेंनी मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत पक्षाचे भगवेकरण केल्यानंतर, आपला मोर्चा पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांविरोधात वळवला आहे. मनसे 9 फेब्रुवारीला सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्यांविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सीएए विरोधातील मोर्चांना मोर्चातून उत्तर देईल, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे.

 

पण त्यांनी एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांचा नामोल्लेख करत देशप्रेमी मुस्लिम आपलेच असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान मनसेने भगवा झेंडा का निवडला यावर आपल्या भाषणात भाष्य करायला राज ठाकरे विसरले नाहीत. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला झेंडा योग्य प्रकारे हाताळण्याचे आणि हिंदुत्त्व स्वीकारताना मराठी भाषेचा मुद्दा सोडला नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

 

राज ठाकरेंनी पाकिस्तान, बांगलादेशातून अनधिकृतपणे देशात घुसखोरी करणाऱ्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला. आपल्या सैन्याला भविष्यात युद्ध झाल्यास देशातच लढावे लागेल. आपल्याला देशातील शत्रूंपासून सर्वाधिक धोका असल्यामुळे घुसखोरांना देशातून हाकलून द्यावे, असे राज ठाकरे मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलताना म्हणाले.

 

त्याचबरोबर जेव्हा नरेंद्र मोदी चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली. पण त्यांनी जेव्हा चांगली गोष्ट केली, तेव्हा त्यांचे अभिनंदन करणाराही मीच होतो. कलम 370 असो किंवा राममंदिराचा विषय, त्यांचे अभिनंदन करणारा मीच होतो. कारण मी माणूसघाणा नाही, मोदी सरकारला यासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याची भूमिका राज ठाकरेंनी अधिवेशनातील भाषणात मांडली.

Find out more: