औरंगाबाद: एवढे दिवस झाले राज ठाकरे राज्याच्या राजकारणात आहेत. पण त्यांना आत्ताच मशिदीवरील भोंग्याचा त्रास कसा व्हायला लागला, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. गुरुवारी मनसेच्या अधिवेशनात आगामी राजकीय वाटचालीची दिशा राज ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. आपल्या भाषणातून राज यांनी हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. त्यांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्च्यांविषयी संताप व्यक्त केला होता.

 

त्याचबरोबर प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. आमच्या कुणाला आरतीचा त्रास होत नाही. मग तुमच्या मशिदीवरील भोंग्याचा त्रास आम्ही का सहन करायचा?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शुक्रवारी ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी यावेळी म्हटले की, एवढे दिवस झाले तुम्ही राज्याच्या राजकारणात आहात. मशिदीवरील भोंग्याचा आजपर्यंत तुमच्या कानाला त्रास झाला नाही का, असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला.

 

केवळ राजकारणासाठी राज ठाकरे हा मुद्दा बाहेर आणत आहेत. शिवसेना सेक्युलर झाल्यामुळे त्यांच्यासाठी राजकीय जमीन तयार झाली आहे. मनसे याचा फायदा उठवण्यासाठी राजकारण करत आहे. पण मनसेला आम्ही घाबरत नाही. आजपर्यंत सगळ्यानाच ‘एमआयएम’ने शिंगावर घेतले. आम्ही कुणालाही घाबरत नसल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.                                     

Find out more: