
मुंबई : 23 जानेवारीच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केल्यानंतर CAA आणि NRC ला राज यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी त्यावेळी घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही केली होती. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत राज यांना नव्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. CAA आणि NRCच्या समर्थनासाठी आपला मोर्चा नसल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे हे नव्या भूमिकेमुळे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.
सोमवारी मुंबईतील रंगशारदा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शॅडो कॅबिनेट आणि 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. या बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उशिरा आले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच ते रंगशारदामधून बाहेर गेल्याची माहिती समोर आली.
बैठकीतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे आपले मत व्यक्त केले. NRC ला पाठिंबा देऊन मनसे भाजपच्या जवळ जात असल्याची लोकांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अशा भावना काही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे मांडल्या. तसेच, आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी भूमिका घेतली. मग आता NRC-CAA ला पाठिंबा देत भाजप बरोबर जात आहोत का? असा सवालही पक्षातील काही सदस्यांनी विचारला.