मुंबई : जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये स्थानिक भागातील नागरिकांसाठी त्याअनुषंगिक सोयी-सुविधांचा अंतर्भाव करुन हे प्रकल्प कसे पूर्ण होतील याचा विचार विभागाने करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. मंत्रालय येथे आयोजित जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या प्रकल्पासंदर्भातील बैठकीत पाटील बोलत होते. राज्याच्या विविध भागात असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पातील अडचणींबाबत स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत बैठकांचे आयोजन करण्यात आले.
दमणगंगा-नार पार खोरे
दमणगंगा-नार पार खोऱ्यातील प्रमुख नदी जोड प्रकल्पासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील आमदार समवेत बैठक झाली. यासंदर्भात असलेल्या प्रकल्प पूर्ततेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. तसेच स्थानिक पातळीवरील समस्या, प्रकल्पातील पाणीसाठा आकडेवारी संदर्भात तसेच इतर काही अडचणींबाबत तज्ज्ञांकडून तपासणी करुन योग्य ती खात्री करावी. सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास त्या कराव्यात, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
श्री. भुजबळ यांनी सांगितले की, प्रकल्पास आमचा विरोध नाही पण स्थानिकांना त्यांच्या हिश्श्याचे मिळणारे पाणी तसेच महाराष्ट्राला मिळणारे पाणी पूर्णत: मिळावे, अशी नाशिक जिल्ह्यातील आमदारांची मागणी आहे. त्यानुसार विभागाने काम करावे. यावेळी आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, दिलीप बनकर, हिरामण खोसकर व नितीन पवार यांनीही चर्चेत भाग घेतला.
पिंपगाव कुटे बंधारा
हिंगोली जिल्ह्यातील मौजे पोटा, जोड परळी व पिंपळगाव कुटे बंधारा प्रशासकीय मान्यतेसंदर्भात आमदार चंद्रकांत ऊर्फ राजेश नवघरे यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. या प्रश्नाबाबत आमदार राजेश नवघरे यांनी मराठवाड्यातील व हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळाबाबत माहिती देऊन अनुशेष पूर्ण करण्याबाबत विनंती केली. या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा विषय राज्य जलपरिषदेसमोर ठेवून मार्गी लावला जाईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
निम्न तापी प्रकल्प पाडळसे
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसेच्या कामाला गती मिळण्याबाबत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आमदारांनी प्रकल्प पूर्तीसाठी निधी मिळावा अशी आग्रही मागणी केली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पातील अडथळे दूर करून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
निरा देवघर प्रकल्प भोर
भोर येथील निरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालवा व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम बंद नलिकेद्वारे सुधारित सर्वेक्षण करणे, गुंजवणी-चापेट प्रकल्पाच्या वाजेघर वांगणी खोरे या उपसा जलसिंचन योजना प्रकल्पात समाविष्ट करून उपसा जलसिंचन योजनेद्वारे क्षेत्र ओलीताखाली आणणे, निरा-देवधर प्रकल्प - वेनवडी उपसा जलसिंचन योजना कामांना निधी देणे, निरा-देवधर प्रकल्प, भोर उजवा कालवा अस्तरीकरण निधी मिळणे, गुंजवणी-चापेट प्रकल्प वेल्हे या प्रकल्पाच्या विविध कामांबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत मंत्री श्री.पाटील यांनी बैठक झाली.
स्थानिकांना जास्तीत जास्त पाण्याची आवर्तने कशी देता येतील हे विभागाने तपासून पहावे. तसेच यासंदर्भातील अधिकचा निधी वाढवून मिळेल का हे देखील पहावे, अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. तसेच आमदार अशोक पवार यांच्या समवेत झालेल्या शिरुर घोडनदीवरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास निधी मिळणे, चासकमान कॅनॉल अस्तरीकरण करणे, डिंबा कॅनल अपूर्ण कामाबद्दलच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता आदींबाबत विचार करावा. महत्वाच्या दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करावे व 10 ते 15 दिवसात यासंदर्भातील सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी दिले.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इ.सिं.चहल, सचिव लाक्षक्षेत्र राजेंद्र पवार, सचिव प्रकल्प समन्वयक संजय घाणेकर, कोकण व तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे खलिल अन्सारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.