शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए ,सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू,’ असे मुनगंटीवार भाजप – शिवसेना सत्ता स्थापनेबाबत म्हणाले.
पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी भाजप – मनसे संभाव्य युती बाबत भाष्य केलं. या बाबत बोलताना ते म्हणाले की, ‘मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही आणि तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले तरीही भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी असल्याचं चित्र आहे. तसेच मुनगंटीवारांच्या भाजप- शिवसेना सत्तास्थापनेबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.