
CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला आहे. हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथे केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणले आहे, असे आव्हाड म्हणाले.
NRC विरोधात पुण्यातील सारस बागेजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी बोलताना ते म्हणाले, यावेळेस आव्हाड यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केले. पोलीस सरकारच्या आदेशानेच चालतात त्याचमुळे भीमा कोरेगाव हिंसाचार घडला असा आरोपही आव्हाड यांनी केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘CAA चा विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गानेच आपण पुढे गेलं पाहिजे असेही आव्हाड म्हणाले. इस्लाम खतरेमें है याऐवजी जेव्हा संविधान खतरेमें है असे नारे ऐकू येतात तेव्हा हा देश पुन्हा एकजूट होत असल्याची जाणीव होते,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीने स्थापन केलेलं सरकारन अनेकांच्या डोळ्यात खुपतं आहे. मात्र कोणी कितीही काड्या केल्या तरीही आमच्यात आग लागणार नाही हे लक्षात ठेवा अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपालाही सुनावले.