नवी दिल्ली : सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. निर्मला सीतारमण या यावेळी पिवळ्या रंगाच्या साडीत दिसून आल्या. त्यांनी गेल्या वर्षी जेव्हा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा त्यांनी गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी किनार होती.
पिवळ्या रंगाची साडी निवडण्यामागे यंदा अनेक खास कारण असू शकतात. पिवळ्या रंगाला भारतीय परंपरा आणि हिंदू शास्त्रात शुभ मानले जाते. त्याचबरोबर या रंगांचे वैशिष्ट्य पाहायला गेले तर समृद्धी आणि भरभराटीचे पिवळा रंग हा प्रतीक असल्यामुळे पिवळ्या रंगाच्या साडीत देशाचा लाल वही खाता सर्वांसाठी समृद्धी घेऊन येईल, म्हणून निर्मला सीतारमण यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली, अशी चर्चा आहे.
दरम्यान पारंपरिक चामड्याच्या बॅगमध्ये बजेट आणण्याची परंपराही निर्मला सीतारमण यांनी तोडली आहे. लाल रंगाच्या कापडी पिशवीत गुंडाळलेली कागदपत्रे घेऊन त्या संसदेत पोहचल्या. ‘सुटकेसची देवाणघेवाण’ नरेंद्र मोदी सरकारमध्ये होत नाही, हा संदेश देण्यासाठी अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलण्यात आली. लेदर सूटकेसची जागा आता लाल कापडी पिशवीने घेतल्याचे निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी सांगितले होते.
अशा अनेक परंपराना निर्मला सीतारमण यांनी फाटा दिला आहे. जसे, त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. मोदी कॅबिनेटमध्ये त्या त्यांच्या नवीन विचारांसोबतच परंपरा जपणारी मंत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्य़ा पेहरावावरुन हे नेहमीच दिसून आले आहे.