केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले. तसेच केंद्र सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच पर्यटन क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ आयडीबीआय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकणे, रेल्वेचे खासगीकरण करण्याबाबतचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्था कोलमडल्याचे दर्शन घडवतात, अशा शब्दांत ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. दरम्यान, २०३० मध्ये भारत हा सर्वात युवा देश होणार असून या युवा शक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग या अर्थसंकल्पातून विकसित होतांना दिसत नाही,’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.