नाइट लाइफचा अर्थ मौजमजा, छंद किंवा पब आणि बार नाही - उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबईमध्ये नाइट लाइफचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मात्र भाजपने या योजनेवर मोठ्या प्रमाणात टीका केली. या योजनेच्या नावाखाली चंगळवाद येणार असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत या यावर प्रत्युत्तर दिले आहे.
जे तुमच्या मनात आहे ते ‘नाइट लाइफ’मध्ये नाही असे ते म्हणाले. तसेच जे तुमच्या मनात आहे ते त्या नाइट लाइफमध्ये नाही असं अत्रेंच्या शैलीत म्हणता येऊ शकतं. नाइट लाइफचा अर्थ असा की, ‘लाइफ’ हा शब्द महत्त्वाचा आहे त्यात. जीवन… जे दिवसा चालतं तेच मुंबईत रात्री चालतं. मुंबई हे न झोपणारं शहर आहे… झोपत नाही तर मग रात्री करतं काय नेमकं? तर कष्ट करत असतं. मग त्या कष्टकऱ्यांना जर आपण त्यांच्या हक्काचं म्हणण्यापेक्षा त्यांना आवश्यक असलेले जेवण या गोष्टी, इतर काही सोयी असतील त्या उपलब्ध करून द्यायच्या की नाही द्यायच्या? मुंबईकर हा दिवसासुद्धा कष्ट करतो.
तो थकूनभागून उशिरा संध्याकाळी घरी जातो. घरी जाऊन थोडासा विसावून बाहेर पडतो. तोपर्यंत सगळं बंद झालेलं असतं. तर नाइट लाइफचा अर्थ मौजमजा, छंद किंवा पब आणि बार नाहीये. तर कुटुंबासमवेत दिवसभरात तिकडे जाणे होत नाही. कुठे रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो म्हणा किंवा आणखी काही. या सगळय़ा गोष्टी नाइट लाइफ आहेत. म्हणजेच मुंबई ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.