मुंबई : सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेकव विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या भूमिकेविषयीही भाष्य केले. शरद पवार यांच्याकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल आहे असे अनेक वेळा बोलले जाते. मात्र शरद पवार यांच्याकडे सरकारचा रिमोट कंट्रोल नाही, ते सरकारचे मार्गदर्शक आहेत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी त्यांची सामनासाठी दिलेली तिसरी मुलाखत प्रदर्शित झाली.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीविषयी बोलताना म्हणाले की, आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. आणि हो, तुमच्या प्रश्नाचा रोख मला कळाला आहे. तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून कधी वागत नाही. त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात' असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
शरद पवारांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करत असतात. समजा काही विषय असला तर मीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे. पंतप्रधान मोदी व सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटू असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.