
मुंबई : मनसेने मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात पुकारलेल्या मोर्चात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यांचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. गिरगावातील हिंदू जिमखान्यापासून दुपारी बारा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल.
या देशातून बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना ‘चले जाव’ असा इशारा राज ठाकरेंचा मोर्चा देणारा आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दलाचे कार्यकर्ते, देशप्रेमी जनता या मोर्चात सहभागी होईल. त्यामुळे वेगळे कोण कोण सहभागी होईल, असे सांगणे चुकीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज जी राजकीय भूमिका राज ठाकरे मांडतील, ती मनसेची पुढची दिशा ठरवणारी असेल, असे मतही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले. दुपारी बारा वाजता राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदू जिमखान्यापासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर आझाद मैदानावर पोहचल्यानंतर राज ठाकरे संध्याकाळी सभेला संबोधित करतील. मोर्चाला राज्यभरातील मनसैनिक उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. अगदी ‘मातोश्री’समोरही मनसेने पोस्टरबाजी केली होती. मनसेने सोशल मीडियातूनही मोर्चासाठी चांगलीच ‘मोर्चेबांधणी’ केली आहे. दोन ते तीन लाख जण मोर्चासाठी येण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य स्टेज उभारण्यात आला असून दोन लाख जणांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.
मनसे नेत्यांची आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी भाषणे होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.