
तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठे बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल घेणार आहेत. केजरीवाल यांनी त्यानिमित्त बुधवारी सकाळी उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. रामलीला मैदानावर येत्या 16 फेब्रुवारी रोजी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. उपराज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपल्या घरी जाऊन केजरीवाल आमदारांची बैठक घेत आहेत.
तत्पूर्वी आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने सांगितल्याप्रमाणे, सरकार स्थापनेवर चर्चा आमदारांच्या बैठकीमध्ये केली जाणार आहे. यासाठी सर्वच आमदारांनी पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर एकमत होणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे, सकाळपासून केजरीवाल यांच्या निवासस्थानी हजेरी लावण्यास नवनिर्वाचित आमदारांनी सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये केजरीवाल यांच्या आपने 70 पैकी तब्बल 62 जागा काबिज केल्या. तर भाजपने 8 जागा मिळवल्या आहेत. यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध नेत्यांनी केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्या.