सांगली – गर्भलिंग चाचणी कायद्याचा इंदुरीकर महाराज यांनी भंग केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

 

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की कीर्तन करत असताना चेष्टा, मस्करी, विनोद करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यात विकृत लक्षणे दिसतात. युटय़ूबवर देखील त्यांच्या कीर्तनाची ध्वनिचित्रफीत अपलोड करण्यात आली असून त्यांनी यामध्ये पुत्र प्राप्तीसाठी दिलेला संदेश आहे. त्यांनी केलेले वक्तव्य संविधानविरोधी आणि अशास्त्रीय आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे त्यांनी केलेले विधान उल्लंधन असून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी त्यांच्या कीर्तनातून वक्तव्ये दिसून येतात. महिलांची अवहेलना व द्बेष ते करतात.

 

वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून करण्यात येत आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात इंदुरीकर यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. इंदुरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे.

 

हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला. इंदुरीकर यांना पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीने नोटीस पाठवली आहे. इंदुरीकर महाराजांकडून त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुलासा समितीने मागितला आहे. जर नोटीस बजावल्यानंतर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पीसीपीएनडीटीच्या सदस्यांनी म्हटले आहे.

Find out more: