जळगाव : राज्यातील शेतकरी हाच महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडविण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हा प्रथमोपचार असून शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

 

जैन इरिगेशन लि. तर्फे देण्यात येणारा पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार प्रदान सोहळा आज दुपारी जैन हिल्स येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. नंदापूर, ता. जि. जालना येथील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कामगार कल्याण मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, खासदार उन्मेश पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, कवी पद्मश्री ना. धो. महानोर, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, सौ. प्रतिभाताई पवार, सौ. चंद्रकला दत्तात्रय चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, भारताला बलशाली करण्यासाठी ‘शेती आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे’ हा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी सांगितलेला विचार कृतीत आणण्यात येईल. शेती क्षेत्रात बदल घडून येत आहेत. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. हे बदल कौतुकास्पद आहेत. शेतकऱ्यांनी निश्चय करून बदल स्वीकारले पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रगती करीत बदलाचे वारे देशभर पोहोचवावेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 

Find out more: