पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भाजप मध्ये गेलेले पवारांसोबत बाँडिंग असलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीत परत येणार, असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
याबाबत भुजबळ एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे शरद पवारांशी बाँडिंग आहे. भाजपमधील वातावरण त्यांना पटणे शक्य नाही. त्यामुळे सरकार आल्यानंतर ते पुन्हा येण्याची चर्चा सुरु आहे. ते निश्चितपणे परत येणार,’ असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भाजपमधील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. भाजपला खिंडार पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, मात्र भाजपची सूज कमी होत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. दरम्यान, ‘सरकार नसल्यामुळे भाजप नेत्यांना झोप येत नसावी. सरकारला काम करु द्या, मग लोकच ठरवतील, आमचं काही चुकलं तर बाहेर जावं लागेल, मात्र त्यांची अस्वस्थता पहावत नाही,’ अशी सणसणीत टीका भुजबळ यांनी विरोधकांवर केली.