बेळगाव – आज बेळगाव न्यायालयाने शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांचा जामीन मंजूर केला आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात बेळगावातील पोलिस ठाण्यात कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेळगाव न्यायालयाने याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पण आज बेळगाव न्यायालयाकडून भिडेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बेळगावमधील येळ्ळूर गावात गेल्यावर्षी महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संभीजी भिडे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले. येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा, असे वक्तव्य या कार्यक्रमात भिडे यांनी केले होते.
निवडणूक अधिकाऱ्यांनी या वक्तव्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर बेळगावातील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखेला उपस्थित न राहिल्यामुळे बेळगाव न्यायालयाने संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, आज बेळगाव न्यायालयाकडून भिडेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.