पुणे : शिवजयंतीचा कार्यक्रम आज शिवेनेरीवर साजरा झाला. हा सोहळा किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाआघाडीच्या कामावर भाष्य केले.

 

यावेळी त्यांना एका स्थानिक कार्यकर्त्याने शिवस्मारकाबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आता सगळी कामे आम्ही करणार आहोत. अजितदादा आपण आत्तापर्यंत उगाच वेगळे राहिलो. या आधीच आपण एकत्र यायला पाहिजे होते. सरकारे आली आणि गेली. पण हे सरकार पाच वर्षे टिकेल. आम्ही एकत्र आल्यामुळे काही जणांच्या पोटात दुखत आहे. लोकांना हे सरकार आपलेसे वाटत आहे.

 

मगाशी आम्ही कार्यक्रम बघत बसलो होतो, दादांना सांभाळा, असे एक कार्यकर्ता म्हणाला. काळजी करू नका. दादा एवढी वर्षे उगीच वाया घालवली. यापुढेही एकत्र राहू आणि काम करू. शिवप्रभूंना अपेक्षित असलेले राज्य आणू. तर अजित पवारांनीही आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

 

अजित पवार म्हणाले, शिवजन्मोत्सवाला नेहमी येत असतो. पण एवढी गर्दी मी पहिल्यांदाच पाहिली. रयतेचे राज्य आले असे लोकांना वाटते. मुख्यमंत्री आपला माणूस झाला अशी लोकभावना आहे. मराठा आरक्षण आंदोलनात नियमाच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले नाही असे गुन्हे मागे घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 

सध्या महाविकास आघाडीत ‘एल्गार’ परिषदेच्या चौकशीवरून धुसफूस सुरु आहे. SITच्या माध्यमातूनच या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावून धरली होती. या प्रकरणाची चौकशी NIAने करण्याला त्यांचा ठाम विरोध होता. पण या प्रकरणी NIAचौकशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूरी दिल्याने महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शरद पवारांनीही काही पत्रकार परिषदांमध्ये यावर नाराजी व्यक्त केली. पण चौकशीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर खुलासा केला आहे.

 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात त्यानंतर मतभेद निर्माण झाले आहेत का? अशी चर्चा केली जाऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीने CAA/NRC/NPRलाही तीव्र विरोध केला. तर उद्धव ठाकरे यांनी NRCला विरोध असल्याचे सांगत CAA/NPRला विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या मतभेदांच्या चर्चेवर खुलासा केला. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. सगळे प्रश्न आम्ही समन्वयाने सोडवू. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते. पण आम्ही पहिले आमच्या किमान समान कार्यक्रमाला बांधील आहोत.

 

Find out more: