मुंबई : भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. सभागृहाबाहेर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची रणनीती सांगितली.

 

“राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. एक नवा पैसा शेतकऱ्याला दिला नाही. गाजावाजा करुन कर्जमाफी केली. मात्र दोन महिन्यात केवळ 15 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 400 महिने लागतील”, असं गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं.

 

ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील 35 टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरीकडे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. आमच्या महिला आमदारांनी आज सभागृहात निषेध नोंदवला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांवरील अत्याचार थांबावावे, यासाठी सभागृहाचं कामकाज आम्ही बंद पाडलं, असं फडणवीसांनी सांगितलं.

 

सरकार ठोस पावलं उचलतं नाही, तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमचा संघर्ष चालूच राहील. आज संध्याकाळी 6 वाजता आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांनी फसव्या कर्जमाफीविरोधात पत्र लिहिली आहेत. ती पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहोत. शेतकऱ्यांची कशी फसवणूक होतेय, ते राज्यपालांना सांगणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Find out more: