मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती कळवणाऱ्यांना बक्षीस जाहीर केल्यानंतर आता ‘मातोश्री’च्या अंगणातही पोस्टर लावण्यात आलं आहे. वांद्रे पूर्व भागातही मनसेने घुसखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी पारितोषिकाची घोषणा केली. मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रेंनी पोस्टर लावलं आहे.

 

‘घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा! पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्याच रोख 5 हजार 555 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव या संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल’ असं मनसेच्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

 

पुण्यात मनसेने पकडलेले संशयित बांगलादेशी नसून भारतीयच असल्याचं उघड झालं होतं. पीडित कुटुंबाने पोलिसात धाव घेतल्यामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मनसेने सावध पवित्रा घेत ‘शहानिशा करुन सत्यता पटल्यास’ अशी अट स्पष्टपणे लिहिली आहे.

 

याआधीही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली होती. वांद्र्यात जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे आहेत ते साफ करा, असं आवाहन मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केलं होतं.                                                                    

Find out more: