मुंबई : भारत आणि फिनलँड देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान आणि पर्यटन वृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये संवाद महत्त्वाचा दुवा आहे. यातून महाराष्ट्र आणि फिनलँडमधील संबंध अधिक दृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर फिनलँड संसदेच्या वित्तीय समिती शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल यांची भेट घेतली. प्रारंभी राज्यपालांनी फिनलँडच्या संसदीय कार्यप्रणाली आणि समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेत भारतीय संसदीय कामकाजाची माहिती शिष्टमंडळाला दिली. त्याचबरोबर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, वनसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पर्यटन वृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर संवाद महत्त्वाचा आहे.
मैत्री हे भारताचे महत्त्वाचे उद्दिष्ट असून संवादातून विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढणे शक्य आहे, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. भारत आणि फिनलँडची संस्कृती, परंपरा याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. भविष्यातही शिष्टमंडळाने काही काळासाठी भारतात येऊन विविध विषयांचा अभ्यास करण्याचे निमंत्रण राज्यपाल कोश्यारी यांनी दिले.
कंपनी आणि विद्यापीठांबाबत दोन्ही देशात संपर्क आणि सहकार्य कायम राहावे अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली त्यावर राज्य शासन यासाठी सहकार्य करेल, असे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी शिष्टमंडळाला दिले. देशाच्या विकासात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका आहे. उद्योग, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीत महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा असून सध्या महाराष्ट्र आर्थिक बाबीत उत्तम स्थितीत असल्याची भावना फिनलँड संसदेच्या वित्तीय समितीचे अध्यक्ष जोहान्स कोस्कीन यांनी व्यक्त केली.
यावेळी फिनलँड संसदीय शिष्टमंडळातील सदस्य अँडर्स ॲडलेरक्रूझ, सदस्य इवा जोहना एलोरांटा, सदस्य सँनीग्रॅहान-लॅसेनन, सदस्य एस्को किविरंता, सदस्य जुक्का कोपरा, सदस्य मेर्जा कायल्लोनेन, सदस्य पिया लोहिकोस्की, सदस्य आरीस सुमेला, सदस्य जस्सी विहोनेन, सदस्य हेलवी इकावल्को, फिनलँडचे भारतीय राजदुत रिल्वा कोक्कु-रोंडे, फिनलँड देशाचे वाणिज्यदुत मिक्को पॉटसोनेन, जुक्का होलाप्पा, फिनलँडचे मुंबई, गुजरात, गोवा या राज्यासाठींचे वाणिज्यदूत श्रेयस दोषी उपस्थित होते.