
मुंबई : ‘अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मर्यादा देखील वाढवावी आणि सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची सरकारच्यावतीने तातडीने पुनर्बांधणीच्या कामास तातडीने सुरुवात करावी,’ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील असे म्हणाले.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवर पाटील बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सध्या एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. याद्वारे त्या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह चालवणे शक्य नाही. त्यामुळे मिळणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्यात यावी,’ असे ते म्हणाले.
तसेच यंदा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, अपाघातामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, त्यांच्या कुटुंबीयांना आपण चार लाखाची नुकसानभरपाई देतो, त्यामध्येही वाढ करण्यात यावी आणि यामध्ये विम्याचा समावेश करण्यात यावा, असे पाटील म्हणाले.