
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मी सावरकर वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी अस्पृश्यता निवारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा विनायक दामोदर सावरकरांचे मोठे योगदान असल्याचा दावा केला आहे. शरद पोक्षेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सावरकरांचे अस्पृश्यता निवारणात मोठे योगदान असून बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा अस्पृश्यता निवारणात सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. महात्मा गांधींच्या अहिंसा या तत्वाचीही यावेळी त्यांनी हेटाळणी केली. त्या त्या जातीत आंबेडकर आणि महात्मा फुले हे जन्माला आल्याने अपमानाचे चटके त्यांना बसल्यामुळे ते विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. पण सावरकर अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीची भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यथित करतात. त्यामुळे सावरकर दोन्ही राष्ट्र पुरुषांपेक्षा काकणभर श्रेष्ठ असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची वाट कशाला पाहायची. सरकारने महात्मा गांधी, महात्मा फुले यांना महात्मा उपाधी दिली होती का? सावरकरांना स्वातंत्र्य ही उपाधी सरकारने दिली होती का? त्यामुळे आपण आता भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशीच सुरुवात करायची. यामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल, असे अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी यावेळी राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत त्यांना दिल्लीत वेडा मुलगा असल्याचे म्हणत त्यांची हेटाळणी केली. काहीतरी बडबड दिल्लीतील वेडा मुलगा करत असून त्याचे मी आभार मानतो. हिंदू फार थंड असून पेटायला वेळ लागतो. सावरकर यांची भीती आणि दहशत ब्रिटिशांप्रमाणेच आजही आहे. असेच त्या वेड्या मुलाने बोलत राहावे, पण त्याला त्याच्या आजीचा इतिहास माहित नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सावरकर यांच्या स्मारकाला निधी दिला. त्याचबरोबर पोस्टाच्या तिकिटावर सावरकरांचे छायाचित्रे प्रसिद्ध केले होते, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले.
शरद पोंक्षे यांनी यावेळी बोलताना स्वामी विवेकानंदांचा दाखला देत पृथ्वीतलावर प्रत्येक मुलगा जन्माला येणारा हिंदू असतो. मग त्याचे आई-वडील त्यावर धर्मानुसार संस्कार करुन सभासद करतात. येथून कट्टरता सुरु होते, पण हिंदू कट्टर नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात बहुसंख्य 80 टक्के हिंदू असून हे हिंदू राष्ट्र आहे. जगावर एक दिवस हिंदू राज्य असेल, असाही दावा शरद पोंक्षे यांनी केला.
अहिंसा या शब्दाची खिल्ली उडवत पोंक्षे यांनी महात्मा गांधींनाही लक्ष्य केले. अहिंसा हा शब्दच अनैसर्गिक आहे. सर्वोत्तम राज्यकर्ते म्हणून रामराज्य आणि शिवशाही याचा उल्लेख केला जातो. पण छत्रपती आणि प्रभू रामानेही युद्धाने यश मिळवले आहे. प्रभू रामाने अहिंसा नाहीतर युद्ध करून रक्त सांडले. अण्णा हजारेंसारखे लंकेत स्टेज बांधून आंदोलन केले असते तर काय झाले असते, असा सवाल ही केला.
नशीब छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बापूजी जन्माला आले नाहीत. निशस्त्र अफजलखानाला भेटायला शिवाजी महाराज गेल्यास त्याने महाराजांना संपवून टाकले असते. शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी तो विडा उचलून आला होता. पण असे म्हणले की मुसलमानाच्या भावना दुखावतात. आम्ही ब्राह्मण रावणाला जाळून टाकतो, पण रावण हिंदू आणि तपस्वी होता त्याला जाळल्यावर आमच्या भावना दुखावल्या जात नाहीत. पण अफजल खानाचा कोथळा काढल्यावर कशा भावना दुखावल्या जातात असे राज्यकर्ते असतात का, असा सवालही पोंक्षे यांनी केला.
शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आणि मुस्लिम शब्द वापरायचा नाही. मुसलमानांच्या विरोधात महाराज नव्हते हा कुठला शोध काढला. शिवाजीमहाराज त्याक्षणीच संपले असते तर या व्यासपीठावर शरद पोंक्षे ऐवजी शरद उल्ला खानचा कव्वालीचा कार्यक्रम असता. आमच्या माता-भगिनी एवढ्या सुंदर दिसतात त्या कशा दिसतात हे सुद्धा समजले नसते. राजा निशस्त्र झाल्यावर जनतेचा विश्वास कसा राहील, असाही सवाल पोंक्षेंनी केला.