मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तर विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणात विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘विद्या चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. चव्हाण यांचे कुटुंब सुशिक्षित आहे. ते असे काही करणार नाहीत. केवळ राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. तसेच त्यांची ही केस सध्या कौटुंबिक न्यायालयात सुरु आहे, जे सत्य असेल ते लवकरच समोर येईल,’ असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडले आहे.
डॉ. गौरी यांनी आपल्याला दुसरी मुलगी झाली झाली म्हणून सासरच्या मंडळींनी आपला छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला आहे. कौटुंबिक हिंसाचारासोबत विद्या चव्हाण यांच्या दुसऱ्या मुलानं आपला विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी या तक्रारीत केला आहे.