सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक सोशल मिडीयाला गुडबाय करण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केल्यामुळे सोशलमिडीया क्षेत्रात हलकल्लोळ माजला. मोदींच्या या ट्विट मुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले असून मोदी यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर अकौंटवर ट्विट करताना फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यु ट्यूब अकौंटला गुडबाय करण्याचा विचार व्यक्त केला आहे.

 

मोदींच्या या निर्णयामागे काय कारण असावे याचे अनेक तर्क लढविले जात आहेत. दिल्ली हिंसेबाबत मौन बाळगले म्हणून विरोधी पक्षांनी मोदींवर चढविलेले तिखट हल्ले आणि गेले काही दिवस घडलेल्या घटनांचा संबंध याच्याशी जोडला जात आहे. दिल्ली हिंसाचारात अफवांचे आलेले पिक, अफवा पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा होत असलेला दुरुपयोग हेही यामागचे एक कारण असू शकते असे सांगितले जात आहे. राजधानीत याच माध्यमातून वेगाने अफवा पसरल्या आणि त्यामुळे हिंसाचारात वाढ झाली हे सत्य डोळ्याआड करता येणार नाही असेही मत व्यक्त केले जात आहे.

 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींच्या ट्विटला उत्तर देताना द्वेष सोडा सोशल मिडीया नको असे म्हटले आहे तर अनेकांनी तुमच्यामुळे आम्ही ट्विटशी जोडले गेलो, तेव्हा सोशल मिडीया सोडण्याचा विचार करू नका अशी विनंती केली आहे. विशेष म्हणजे मोदी सोशल मिडीयावर टॉप पर्सनॅलिटी असून त्यांचे ट्विटरवर ५ कोटी ३३ लाख, फेसबुकवर ४ कोटी ४५ लाख, इन्स्टाग्रामवर ३ कोटी ५२ लाख फॉलोअर आहेत. २०१९ च्या निवडणुका जिंकल्यावर मोदींनी केलेले ‘ विजय भारत, सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे ट्विट गोल्डन ट्विट ठरले होते. या ट्विटवर १ लाख ८६ हजार रीट्विट आणि ४ लाख १८ हजार लाईक्स मिळाले होते

Find out more: