‘महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ते नाराज असून ते लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल,’ असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

 

ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रात देखील राजकीय भूकंप होईल, असा दावा आठवले यांनी यावेळी बोलताना केला. तसेच ज्योतिरादित्य शिंदे मराठी चांगलं बोलतात. ते मुळचे महाराष्ट्रातील आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये मोठे बदल होतील. तेथे भाजपचं सरकार येईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपला दुप्पट जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने धोका दिला आहे. मात्र, येथेही बदल होऊ शकतात. महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येऊ शकतं,’ असं आठवले म्हणाले.

 

दरम्यान, ‘मला वाटतं एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे पुन्हा परत येतील. जर ते परत नाही आले, तर त्यांचे अनेक आमदार आमच्यासोबत येतील. त्यामुळे भविष्यात आमचं सरकार येऊ शकेल,’ असं ते म्हणाले.                                                      

 

 

Find out more: