मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यापासून बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विधानसभेत कोरोनावर चर्चा सुरु होती. यावेळी त्यांनी मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
“पुण्यात कोरोना रोगाचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनापासून बचावासाठी औषध विक्री दुकानातून तोंडाला लावण्यासाठीचे मास्क अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना हे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
कोरोना महाराष्ट्रातही धडकला आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्या पाच होती. मात्र, या संख्येत आज वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
पुण्यात कोरोना 18 संशयित, तर मुंबईत 15 जण भरती
18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 349 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व 312 जणांचे प्रयोगशाला नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 349 प्रवाशांपैकी 312 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या 18 जण पुण्यात, तर 15 जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.