मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत महत्वपूर्ण घोषणा केली असून पुण्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्यामुळे आजपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत, पण तेथील दहावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. मुंबईतील शाळा, महाविद्यालयेही सुरू राहणार आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत.

 

मुंबई आणि पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झाली असून पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०वर; ३११ रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र कोणताही परिणाम दहावी-बारावीच्या परीक्षांवर होणार नाही. नियोजित वेळापत्रकानुसारच त्या सुरू राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मुंबईतील शाळा सुरूच राहणार आहेत.

 

दरम्यान, काही शाळांनी आज, शुक्रवारी सकाळी शाळा सोडून दिल्यामुळे पालकांमध्ये शाळा बंद होणार वा नाही याबाबत संभ्रम होता. शिवाय अनेक शाळांच्या वार्षिक परीक्षाही अजून सुरू व्हायच्या आहेत, परिणामी शाळा बंद होणार का, परीक्षा कधी होणार याबाबत पालकांमध्ये अनेक  शंका कुशंका होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.                                                                    

Find out more: