
सांगली : राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आल्याची माहिती कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. ते सांगलीमध्ये बोलत होते. तसेच कोरोनाचाही कृषी क्षेत्राला फटका बसत असल्याचेही ते म्हणाले.
पुढे कदम म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे जगातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतात व आपल्या राज्यातही याचा परिणाम जाणवतोय. मात्र तूर्त कोरोनाच्या संकटावर मात करणं हे ध्येय आहे. त्यानंतर नुकसानीच्या बाबतीत विचार होईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही. या संपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर याबाबतीत बोलणं योग्य होईल, असंही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले आहे.