मुंबई : कोरोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे. तो कोणत्या ठिकाणाहून हल्ला करेल हे सांगता येऊ शकत नाही. जर घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवायचा संकल्प करा. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना म्हणजे हे जागतिक युद्ध आहे. या युद्धाची सर्वांना चांगलीच कल्पना आली आहे. या संकटाशी सामना करायचा असेल तर घरामध्ये बसून राहा. एसी बंद करा. खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या, असं सांगतानाच गुढी पाडवा आज आपल्याला जल्लोषात साजरा करता आला नाही. हरकत नाही. आपण गुढी पाडवा जरूर साजरा करू. या संकटावर मात करून करून आपण विजयाची गुढी नक्कीच उभारू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, काल काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच कारणामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही, दुपारी आलो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत. यामुळे काळजी करु नका. गोंधळून जाऊ नका असे उद्धव ठाकरे मह्णाले.